औरंगाबाद: लोकसभेची औरंगाबाद मतदार संघातील निवडणूक संपली. निवडणूक संपल्यानंतर आठ दिवसांनी सर्व मतदार संघातील बुथचा आढावा घेतल्यानंतर शिवसेना-भाजपा युतीमधील भाजपाच्या नेत्यांनी युतीधर्म पाळला नसून प्रदेशाध्य खा. रावसाहेब दानवे यांनी जावाईधर्म पाळला असल्याचा आरोप खा. चंद्रकांत खैरे यांनी केल्याने राजकीय गोटात खळबळ उडाली आहे. खैरे यांच्या आरोपामुळे युतीतील धुसफुस चव्हाट्यावर आली आहे. ही धुसफुस आगामी विधानसभा निवडणुकीत वादाची ठिणगी ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.
लोकसभेच्या निवडणुका जाहीर होईपर्यंत शिवसेना आणि भाजपात दररोज आरोप प्रत्यारोप सुरू होते. शिवसेना नेत्यांनी यापुढे युती नसल्याची डरकाळी दसरा मेळाव्यात फोडल्याने तसेच राज्यातील लोकसभेच्या सर्व 48 जागांसाठी तयारी केल्याने युती होणार नाही असे सर्वांना वाटत होते. लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर मात्र भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी सेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून युती घडवून आली. युती होण्यापूर्वी मतभेद मोठ्या प्रमाणात दोन्ही पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाले होते. पण नेत्यांनी मतभेद आणि मनभेद दूर झाल्याचे जाहीर केले. पण शिवसेनेचा मराठड्याचा गड असलेल्या औरंगाबाद लोकसभा मतदार संघात मात्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांचे जावाई व शिेवसेनेच्या तिकीटावर कन्नड विधानसभा मतदार संघातून निवडून आलेले हर्षवर्धन जाधव यांनी चार महिन्यांपूर्वी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत लोकसभा निवडणुकीत उडी घेतली. सेनेच्या नेत्यांचे म्हणणे होते की, खा. दानवेंनी जावायाची समजूत काढावी. पण दोनवेंनी समजूत तर काढलीच नाही. उलट त्यांनी पाठबळ दिल्याचा आरोप खा. खैरे यांनी केला आहे. भाजपाच्या काही दानवे समर्थक लोकप्रतिनिधींनी हर्षवर्धन जाधवांचे ट्रॅक्ट्रर चालविल्याचा आरोपही शिवसेनेतर्फे केला जात आहे. भाजपाकडून आरोपांचे खंडण केले जात आहे. 23 मे रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल घोषित होणार आहे. या निवडणुकीत जर शिवसेनेला दगाफटका झाला तर त्याचे परिणाम आगामी विधानसभा निवडणुकीवर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. भाजपाने लोकसभा निवडणुकीपूर्वी औरंगाबाद मतदार संघात पंतप्रधानाचे भाजपाला विजयी करा कमळाचे बटण दाबा अशा आशयाचे होर्ल्डिंग लावले होते. त्यामुळे भाजपाही विधानसभा स्वतंत्रपणे लढण्याच्या मनस्थितीत असल्याचे स्पष्ट होते. सेनेच्या आरोपाचे खंडण भाजपाच्या मंडळींकडून केले गेले असले तरी निवडणुकीचा निकाल काय लागतो यावर युतीबाबत सर्व काही अवलंबून आहे. पण एक गोष्ट यावरून सिद्ध होते की, मतभेद जरी दूर झाले असले तरी मनभेद कायम असल्याचे दिसून येते.